Revision 1034045 of "तात्याराव लहाने" on mrwiki

डॉ. तात्याराव लहाने. मुंबईच्या जे.जे.रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे प्रमुख आहेत. लातूर जिल्ह्यातल्या एका लहानशा खेडेगावात जन्मलेल्या तात्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षणही तेथेच झाले. पुढे स्वतःच्या हुशारीने आणि शिक्षकांच्या मदतीने ते डॉक्टर झाले.  प्रतिकूल परिस्थितीशी लढत, सतत पैशाची चणचण सहन करत ते डॉक्‍टर झाले. ते सरकारी नोकरीत लागले; पण तेथील तुटपुंज्या पगारात भागवता भागवता मेटाकुटीला आल्यामुळे खासगी प्रॅक्‍टिस सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात तीव्रतेने येत होता. पण १९९१ मध्ये अगदी लहान वयातच मूत्रपिंडाचा विकार झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. त्यांना आईचीच किडनी बसवण्यात आली आणि डॉ. लहाने यांचा जणू पुनर्जन्मच झाला. बरे झाल्यानंतर खासगी प्रॅक्‍टिसचा विचार डोक्‍यातून काढून टाकून आता हे नव्याने मिळालेले आयुष्य पूर्णपणे गरीब-गरजू रुग्णांच्या सेवेत घालवायचे, असा ठाम निश्‍चय त्यांनी केला. 
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://mr.upakram.org/node/422
| शीर्षक =डॉ.तात्याराव लहाने! एक मोठ्ठा माणूस!
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[http://mr.upakram.org/node/422 ]]
| दिनांक =१७ जून , इ.स. २००७
| ॲक्सेसदिनांक =७ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>

मनुष्यसेवाच ईश्वरसेवा असे म्हणत पंचविसाहून अधिक वर्षे तात्याराव लहाने रुग्णांच्या सेवेत आहेत.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2765659.cms
| शीर्षक =मनुष्यसेवा हीच ईश्वरसेवा
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]]
| दिनांक =८ फेब्रुवारी, इ.स. २००८
| ॲक्सेसदिनांक =७ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>

===खेड्यापाड्यात शिबिरे ===
डॉ. लहाने यांनी महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांत जाऊन शिबिरे घेण्यास सुरुवात केली. पारंपरिक शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला चाळीस दिवस विश्रांती घ्यावी लागत असे. त्यामुळे या रुग्णांचा महिन्याहून अधिक काळ रोजगार बुडत असे. स्वतः ग्रामीण भागातून आल्याने तेथील एक-एक दिवस किती मोलाचा असतो याची जाणीव डॉ. लहाने यांना होती. त्यामुळे या शिबिरांमधून त्यांनी बिनटाक्‍याच्या शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. त्यामुळे रुग्णांना नवी दृष्टी तर मिळालीच; पण त्यांची आर्थिक घडीही विस्कटत नसल्याने मोठ्या प्रमाणावर रुग्ण शस्त्रक्रियेसाठी तयार होऊ लागले. बाबा आमटे यांच्या आनंदवनातील एक हजारांहून अधिक कुष्ठरोग्यांवर; तसेच ठाणे, पालघर, जव्हार, मोखाडा, डहाणू, धुळे आणि नंदूरबार येथील हजारो आदिवासींवर डॉ. लहाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शस्त्रक्रिया केल्या. गोरगरिबांचा हवाला केवळ सरकारी आरोग्य यंत्रणेवर असेल; तर या यंत्रणेने ते रुग्ण आपल्यापर्यंत येतील याची वाट पाहत न बसता त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे आणि आधुनिक तंत्रज्ञान घेऊन पोचले पाहिजे, हा मंत्र डॉ. लहाने यांनी आपल्या कामातून दाखवून दिला. खेड्यापाड्यांतील एकही माणूस इलाजाविना राहता कामा नये, हे त्यांचे जीवितकार्यच बनले. त्यामुळे भारतातीलच नव्हे, तर परदेशांतील कोणत्याही शासकीय, निमशासकीय अथवा खासगी रुग्णालयात झाल्या नसतील एवढ्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया डॉ. लहाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या तीस वर्षांमध्ये केल्या आहेत. मोतीबिंदूच्या एक लाख चाळीस हजारांहून अधिक शस्त्रक्रिया करण्याचा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर आहे. हे अशक्‍य काम कसे शक्‍य झाले, याबद्दल विचारल्यावर डॉ. लहाने अगदी साधे सोपे उत्तर देतात, ""मी माझे काम करत राहिलो. रुग्णांच्या माझ्यावरील विश्‍वासामुळेच ही कामगिरी मी करू शकलो.'' 

कर्मचाऱ्यांचेही सहकार्य 
डॉ. लहाने यांनी आतापर्यंत तब्बल १ कोटी १० लाख रुग्णांची तपासणी केलेली आहे.  त्यांपैकी १ लाख ४१ हजार वृद्धांवर मोतिबिंदूंच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.  आजपर्यंत ४७७ मोफत नेत्रशस्त्रक्रिया शिबिरे, आणि त्यापैकी१७५ विनाटाक्‍याच्या शस्त्रक्रियांची शिबिरे त्यांनी घेतलेली आहेत. बाबा आमटे यांच्या आनंदवनात १४ नेत्रशस्त्रक्रिया शिबिरे घेऊन त्यातून दीड हजार कुष्ठरुग्णांना नवी दृष्टी दिली. जन्मतः अंध असलेल्या दहा हजार व्यक्तींवर शस्त्रक्रिया करून त्यांच्या जीवनात रंग भरला. अगदी वयाने २० दिवसांच्या बाळापासून ते १०२ वर्षांच्या वृद्धापर्यंतच्या रुग्णांवर त्यांनी नेत्रशस्त्रक्रिया केलेल्या आहेत. डॉ. लहाने आणि त्यांच्या ‘चमू’ने मिळून वेगवेगळ्या शिबिरांमधून ३ लाख २० हजार शस्त्रक्रिया केल्या. समाजसेवा करताना डॉ. लहाने यांना जोड मिळते ती त्यांच्या ‘चमू’ची. त्यांच्याशिवाय मी हे कार्य करू शकत नाही, असे डॉ. लहाने सांगतात. त्यांच्या प्रत्येक शिबिराच्या वेळी त्यांच्यासोबत एकूण ६७ कर्मचारी असतात. मुंबईत असल्यावर डॉ. लहाने १४ तास सेवेत असतात. तर मुंबईच्या बाहेर असल्यास तब्बल १८ तास नेत्रचिकित्सेमध्ये घालवतात. विशेष म्हणजे त्यांचा जो ६७ कर्मचाऱ्यांचा चमू आहे त्यांनीदेखील डॉ. लहानेंसारखाच आयुष्य़क्रम' स्वीकारला आहे. 

आज "जे. जे.'मध्ये डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी केवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतूनच नव्हे, तर देशभरातून रुग्ण येतात आणि या प्रत्येक रुग्णाला डॉ. लहाने यांच्याकडूनच उपचार करून घ्यायचे असतात. रुग्णांच्या या इच्छेचा आदर करत डॉ. लहाने आपल्यापरीने ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. इथे आलेला रुग्ण हा आपला जवळचा असावा याच पद्धतीने ते व त्यांच्या विभागातील कर्मचारीही वागताना दिसतात. "सहकाऱ्यांवर विश्‍वास टाकला, की ही मंडळी कोणतेही आव्हान स्वीकारायला तयार असतात, असे मला जाणवले. शिवाय प्रत्येक माणसामध्ये मुळात चांगुलपणा असतोच. तुम्ही तुमच्या वागणुकीतून त्या चांगुलपणाला कसे प्रोत्साहन देता यावरही त्यांची वागणूक ठरत असते,'' असे डॉ. लहाने म्हणतात. त्यामुळे "जे. जे.'मधील रुग्णाभिमुख यंत्रणा हा काही चमत्कार नव्हे, तर मानवी स्वभाव समजून घेत डॉ. लहाने यांनी निवडलेली ती एक प्रकारची उपचारपद्धतीच आहे. सततच्या शस्त्रक्रियांमुळे शारीरिक, मानसिक थकवा येत नाही का, असे विचारल्यावर डॉ. लहाने चटकन म्हणतात, "थकायला वेळ आहे कुठे? ज्या आशेने गोरगरीब रुग्ण माझ्याकडे येतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि शस्त्रक्रियेनंतरचे त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून माझा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. त्यांचे आशीर्वाद हीच माझ्यासाठी मोठी एनर्जी आहे.'' 

आज आपल्या देशात २२ लाख लोकांना डोळ्यांची गरज आहे. मात्र, त्या तुलनेत नेत्रदान करणाऱ्यांची संख्या आहे फक्त ४९ हजार! त्यामुळे शस्त्रक्रिया करण्याइतकाच नेत्रदानाचा प्रसार, हेदेखील आपलेच काम आहे, असे डॉ. लहाने मानतात. शिवाय एका डॉक्‍टरकडून किंवा एखाद्या विभागाकडून किती शस्त्रक्रिया होऊ शकतात याला मर्यादा आहेत. डॉ. लहाने यांनाही त्याची जाणीव आहेच. त्यामुळे कामाचे लोण आपल्या पलीकडे पोचवण्याची त्यांची धडपड सतत सुरू असते. महाराष्ट्रातील तसेच भारतातील शेकडो तज्ज्ञांना या शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण देण्याचे काम त्यांनी स्वीकारले आहे, ते याच उद्देशाने. जगभरातल्या गरीब रुग्णांपर्यंत ही सेवा पोचावी या उद्देशाने अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत त्यांचे संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. 

==="जे. जे.'चे अधिष्ठाता ===
"जे. जे.'च्या नेत्रशल्य विभागाला नवी उंची प्राप्त करून दिल्यानंतर सुमारे दोन वर्षांपूर्वी डॉ. लहाने यांनी "जे. जे.'च्या अधिष्ठातापदाचा कार्यभार स्वीकारला. त्या वेळी बाह्यरुग्ण विभाग अतिशय मोडकळीस आला होता. साडेपाच कोटी रुपये खर्चून त्यांनी तो सर्वप्रथम अद्ययावत करून घेतला. रुग्णालयातील संगणक यंत्रणा सुधारण्यात आली. रुग्ण तपासणी आणि रुग्णांचे उपचार संगणकामार्फत सुरू करण्यात आले. पूर्वी कागदोपत्री ज्या रुग्ण तपासण्या व्हायच्या त्यातून ८ लाख रुपये जमा व्हायचे. संगणकीकरणानंतर पहिल्याच महिन्यात १९ लाख रुपये इतके उत्पन्न जमा झाले. आता प्रत्येक महिन्याला ३८ लाख रुपये इतके उत्पन्न मिळतेच, शिवाय त्यामुळे रुग्णांची गैरसोयही कमी झाली आहे. व्यवहारात पारदर्शकता आली. रुग्णांना तत्काळ रिपोर्ट मिळू लागले. एम.आर.आय., सी.टी.स्कॅन, अँन्जिओग्राफीसंबंधीचे रिपोर्ट संबंधित डॉक्‍टरांना त्याच्या विभागातील संगणकावर थेट पाहून लगेचच पुढील उपचार सुरू करण्यास मदत मिळाली. उपचारांमधील विलंब कमी झाला. हे रुग्णालय आपले आहे, तिथे आपली व्यवस्थित काळजी घेतली जाते, असा विश्‍वास रुग्णांमध्ये निर्माण झाला. त्यातून एका वर्षात १ लाख ७० हजार बाह्यरुग्णांची वाढ झाली. हळूहळू आंतररुग्ण उपचारांतही वाढ करण्यात आली. पूर्वी "जे. जे.'त वर्षाला १९ हजार मोठ्या शस्त्रक्रिया व्हायच्या. डॉ. लहाने यांनी सर्व प्राध्यापक आणि पथकप्रमुखांना भेटून त्यांत वाढ करण्याची विनंती केली. त्याचा परिणाम असा झाला, की दहा हजार तास जास्तीचे काम करून त्याच डॉक्‍टरांनी वर्षभरात तब्बल २५ हजार मोठ्या शस्त्रक्रिया केल्या. रुग्णांची संख्या वाढली त्या तुलनेत कर्मचारीवर्ग पुरेसा असणे तितकेच आवश्‍यक होते. म्हणून डॉक्‍टरांनी शासनाकडे पाठपुरावा करून ६२१ नर्सेसची पदे, ५७ प्राध्यापकांची पदे मंजूर करून घेतली. यंत्रणेत अशा प्रकारे सुधारणा घडवून आणत असतानाच डॉ. लहाने यांनी "मिशन चकाचक' हाती घेतले. स्वच्छता कामगारांच्या बैठका बोलावून त्यांना  ‘हे रुग्णालय फक्त तुम्हीच स्वच्छ ठेवू शकता,' हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयातील जेवणाचा दर्जा सुधारला. मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी ७५० खाटा आणि अभ्यासासाठी प्रत्येकाच्या खोलीत टेबलखुर्च्यांची सोय केली. 

ही यादी वाढत जाणारी आहे. कारण डॉ. लहाने यांचे काम एका जागी थबकणारे नाही. जसजशी ज्या गोष्टीची गरज लागेल तसतसे बदल घडवून आणण्यावर, नव्या गोष्टी करून पाहण्यावर त्यांचा विश्‍वास आहे. सध्या "जे. जे.'च्या आवारात सुपर स्पेशालिटी विभाग उभारण्यासाठी त्यांनी स्वतःला गाडून घेतले आहे. ते काम हातावेगळे होईतो नवे आव्हान त्यांना खुणावू लागेल आणि त्यातून केवळ "जे. जे.'मध्येच नव्हे, तर एकूण राज्याच्या आरोग्यव्यवस्थेत नवे पायंडे पडतील यात शंका नाही. 

===डॉ. रागिणी यांची मोलाची सोबत ===
डॉ. तात्याराव लहाने यांच्या यशात डॉ. रागिणी पारेख यांचा वाटा तितकाच मोलाचा आहे. "रागिणीची साथ मिळाली नसती, तर मला नेत्रविभाग चालवणेच कठीण गेले असते. माझ्या "पद्मश्री'मध्येही रागिणीचा मोठा वाटा आहे,' असे डॉ. लहाने मान्य करतात. १९९८पासून डॉ. रागिणी  या डॉ. लहाने यांच्याबरोबर काम करत आहेत. सध्या त्या ‘जे. जे.'च्या नेत्रशल्यचिकित्सा विभागाच्या प्रमुख म्हणून काम पाहतात. २००५मध्ये त्यांनी तीन दिवसांत मोतीबिंदूवरील २४९ शस्त्रक्रिया केल्या. त्याच्या पुढच्याच वर्षी तीन दिवसांत २६७ शस्त्रक्रिया करून त्यांनी नवा विक्रम रचला. डिसेंबर २००६मध्ये तीन दिवसात २८६ शस्त्रक्रिया आणि १० तासात ११० बिनटाक्‍याच्या शस्त्रक्रिया करून त्यांनी आणखी पुढची पायरी गाठली. आजही दिवसाला डोळ्यांच्या ४० ते १०० शस्त्रक्रिया त्या न थकता करतात. दिवसाचे १६ तास काम करणाऱ्या डॉ. रागिणी यांनी डॉ. लहाने यांच्याबरोबर आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास २०० शिबिरांत भाग घेतला असून शेवटपर्यंत तळागाळातील रुग्णांसाठी त्यांना काम करायचे आहे. 

===कार्याचा सन्मान करणारे पुरस्कार ===
नेत्रशल्यचिकित्सा क्षेत्रातील कामगिरीचा गौरव म्हणून डॉ. लहाने यांना आतापर्यंत ‘मराठवाडा गौरव पुरस्कार', ‘लातूर गौरव पुरस्कार', ‘सामाजिक कृतज्ञता पुरस्कार', ‘जीवनगौरव पुरस्कार' अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २००७ मध्ये डॉ. लहाने यांनी आपली एक लाखावी शस्त्रक्रिया पार पाडली. त्यांचा हा विक्रम पाहून २००८ मध्ये भारत सरकारने त्यांना "पद्मश्री' बहाल केली. 

;कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून बदल घडवला: 
असे म्हणतात, की दुसऱ्यापेक्षा स्वतःला बदलणे हे जास्त सोपे असते. मात्र लहाने यांनी स्वतःप्रमाणेच त्यांच्या स्टाफच्या मनोवृत्तीतही आमूलाग्र बदल घडवून आणला. घड्याळ्याच्या काट्यावर काम करणे मान्य नसल्याने डॉ. लहाने दिवसाचे १६ ते १८ तास काम करतात. शासकीय सुट्या असोत वा शनिवार-रविवार, ते कायम कामात व्यग्र दिसतात. लहाने यांचे कामाप्रती हे समर्पण आणि निष्ठा पाहून त्यांच्या स्टाफला शेवटी बदलावेच लागले. एवढेच नव्हे, तर "जे. जे.'चा नेत्रविभाग आज इथल्या प्रत्येक विभागासाठी एक रोल मॉडेल बनला आहे. "खरे तर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच हा बदल घडवून आणता आला,' असे डॉ. लहाने कृतज्ञतापूर्वक नमूद करतात. 

लाखो लोकांना नवी दृष्टी देणारे डॉक्‍टर म्हणून महाराष्ट्र तात्याराव लहाने यांना ओळखतो; पण त्यांचे काम हे केवळ ऑपरेशन्सची संख्या वाढवण्यापुरते किंवा खेडोपाडी जाऊन ऑपरेशन्स करणे एवढ्यापुरते मर्यादित नाही. एका सरकारी रुग्णालयाला अत्याधुनिक आणि आरोग्य यंत्रणेला रुग्णाभिमुख करण्याचे आव्हान स्वीकारणारा प्रशासक म्हणूनही डॉ. लहाने यांच्या कारकिर्दीकडे पाहावे लागते. हे काम यशस्वी करण्यासाठी केवळ कळवळा नाही, तर दूरदृष्टीही लागते. तात्याराव लहाने यांची कथा ही अशाच दूरदृष्टीची कथा आहे. ‘जे. जे.'सारख्या सरकारी रुग्णालयात हा बदल घडवून आणला आहे प्रख्यात नेत्रशल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने यांनी! ‘विक्रमी शस्त्रक्रिया करणारे डोळ्यांचे डॉक्‍टर' म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. लहाने सध्या जे. जे. रुग्णालयात अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत. रुग्णांची सोय केंद्रस्थानी ठेवून त्यांनी नेत्रशल्यचिकित्सा विभागाचा तर कायापालट केलाच; पण ‘जे. जे.'तील प्रत्येक विभाग आणि यंत्रणा कार्यक्षम आणि रुग्णाभिमुख बनवण्यावर त्यांनी भर दिला हे विशेष. सर्वसामान्य रुग्णांना सरकारी रुग्णालयांखेरीज दुसरा पर्याय नसतो; पण त्यांच्या हातात पैसा नाही, म्हणून त्यांना कमी दर्जाच्या सेवाच मिळणार, हे दुष्टचक्र तोडणे हेच डॉ. लहाने यांनी आपले काम मानले. जे काम करायचे ते पूर्ण झोकून देऊन आणि त्यातल्या समस्यांना हात घालत, हे जणू डॉ. लहाने यांच्या स्वभावातच होते. त्यामुळे सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून गरीब रुग्णांवर शस्त्रक्रिया करत राहणे, असा सरधोपट मार्ग ते स्वीकारतील अशी शक्‍यता नव्हती. १९९४ मध्ये डॉ. लहाने ‘जे. जे.'च्या नेत्रशल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख म्हणून रुजू झाले, तेव्हा हा विभाग रुग्णांसाठी जास्तीत जास्त कसे काम करू शकेल याचाच विचार त्यांच्या डोक्‍यात घोळत होता. त्यामुळे, मोतीबिंदूची ऑपरेशन्स करणारी फेको मशिन्स विकत घेण्याचा निर्णय त्यांनी इथे दाखल झाल्या झाल्या घेतला. आज ‘जे. जे.'मध्ये ९ फेको मशिन्स आहेत. एवढी मशिन्स कोणत्याही शासकीय, निमशासकीय; एवढेच काय, खासगी रुग्णालयांतही नाहीत. पूर्वी वर्षाला ६०० डोळ्यांच्या शस्त्रक्रिया इथे व्हायच्या. आज तोच आकडा वीस हजारांच्या वर गेला आहे. ज्या शस्त्रक्रिया आधी टाके घालून केल्या जायच्या, त्या आज फेको टेक्‍नॉलॉजीद्वारे केल्या जातात. यामध्ये ३ मिलिमीटरचे भोक पाडून सात मिनिटांत शस्त्रक्रिया पूर्ण केली जाते. खासगी रुग्णालयात या पद्धतीने केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी १५ ते २० हजार रुपये मोजावे लागतात. ‘जे. जे.'त मात्र हीच शस्त्रक्रिया मोफत होते. ‘जे. जे.'च्या नेत्रविभागाची घडी बसवल्यावर डॉ. लहाने यांनी एकूण राज्यभरातील ग्रामीण आणि गरीब जनतेच्या नेत्रसमस्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. ‘जे. जे.'मधील अनुभवामुळे त्यांना एकूण परिस्थितीचा अंदाज येत होताच. त्यामुळे त्यांनी आपली रुग्णसेवा केवळ ‘जे. जे.'तल्या रुग्णांपुरती मर्यादित ठेवली नाही. 

===डॉ. तात्याराव लहाने यांचा करिअरग्राफ ===
१९८१ : मराठवाडा विद्यापीठातून मेडिसिनमधील पदवी प्राप्त. 

१९८५ : एम.बी.बी.एस. इन ऑप्थॉमॉलॉजी. 

१९९४ : जे.जे.रुग्णालय - नेत्रशल्यचिकित्सा विभागप्रमुख. 

२००४ : "जे. जे.'त रेटिना विभागाची सुरुवात. 

२००७ : मोतीबिंदूवरील एक लाखावी यशस्वी शस्त्रक्रिया. 

२००८ : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित. 

२०१० : जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता

<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.saptahiksakal.com/saptahiksakal/20111231/5312878196652021601.htm
| शीर्षक =लाखमोलाची "दृष्टी'
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]]
| दिनांक =३१ डिसेंबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =७ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>

== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भसूची}}

== बाह्य दुवे ==
* [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2765659.cms महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रातील तात्याराव लहानेवरील लेख:  मनुष्यसेवा हीच ईश्वरसेवा]