Revision 1055278 of "आधुनिक शिक्षण भगिरथ कर्मवीर भाऊराव पाटील" on mrwiki

{{शुद्धलेखन}}

आधुनिक शिक्षण भगिरथ पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील
                                                                          [[सदस्य:प्रा.द.म.डांगे|प्रा.द.म.डांगे]] ([[सदस्य चर्चा:प्रा.द.म.डांगे|चर्चा]]) १६:१७, २५ सप्टेंबर २०१२ (IST)प्रा. द.म.डांगे
                                                                         डी.पी.भोसले कॉलेज, कोरेगाव.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी गंगाबाई मातेच्या पोटी झाला. पायगौंडा पाटील हे भाऊराव यांच्या पित्याचे नाव. मुळातच भाऊराव पाटील यांचे घराणे जैन धर्मिय असल्याने लहानपणापासून त्यांच्या घरात कडवी शिस्त होती. मात्र वडिल महसूल विभागात कार्यरत असल्याने घरी अनेक शेतकरी, शेतमजुरांची ये-जा असे. नोकरीच्या निमित्ताने भटकंती ठरलेली होती. तेंव्हा या भटकंतीमध्ये विविध जाती-धर्माच्या लोकांशी पायगौंडा पाटील यांचा संपर्क आला. यावेळी संवेदनशील मनाच्या भाऊरावांनी  बहुजन समाजाचे जीवन जवळून पाहिले होते.
भाऊराव पाटलांच्या बालपणीचा कालखंड पाहिला तर, आपल्या ध्यानात एक गोष्ट येते, ती म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात महात्मा फुले यांनी निर्माण केलेल्या सत्यशोधकी चळवळीचे वातावरण होते. त्यातल्या त्यात कोल्हापूर संस्थानचे राजे राजर्षी शाहू महाराजांनी सत्यशोधकी विचारधारेत अवलंबिलेल्या  कार्याने संपूर्ण महाराष्ट्रात ब्राह्मण विरुध्द ब्राह्मणेतर हा संघर्ष पेटलेला होता.
ब्राह्मण वर्गाच्या साचेबंद, कट्टर, सनातनी चालीरिती आणि विषमतावादाच्या संचलना  विरोधात ब्राह्मणेतर वर्गाने त्यातल्यात्यात मराठा समाजाने सक्षमपणाने चालविलेली सत्यशोधक चळवळ हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीसाठीचा महत्त्वाचा कालखंड होता. ब्राह्मण वर्गाच्या लढ्याचे नेतृत्त्व पुण्यातून कॉग्रेसच्या जहाल गटाचे नेते बाळ गंगाधर टिळक करीत होते,  तर ब्राह्मणेतर वर्गाचे नेतृत्त्व उदार अंत:करणाचे मातृहृदयी पण प्रसंगी पित्यासारखी कठोर भूमिका  घेणारे राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूरहून करीत होते. 
शिक्षणाच्या निमित्ताने भाऊराव पाटील हे कोल्हापूरला दिगंबर जैन बोर्डींगमध्ये रहायला होते. संवेदनशील मनाच्या आणि समाजसेवेची अत्त्यंत आवड असणा-या भाऊरावांच्या व्यक्तीमत्वावर सुसंस्कार होण्यासाठीचे पोषक वातावरण कोल्हापूर मध्ये होते. कोल्हापूर ही सत्यशोधक चळवळीचे केंद्र असल्याने मुळातच  बंडखोर असलेल्या भाऊरावांच्या मनात बीज अंकुरण्यासाठी पोषक वातावरण मिळाले. १९०८ मध्ये राजर्षी शाहूनी अस्पृशांच्या मुलांसाठी ‘मिस क्लार्क होस्टेल’ सुरु केले. या हॉस्टेलच्या उद्घाटन समारंभास भाऊराव गेले होते. कार्यक्रमानंतर भाऊराव बोर्डींगमध्ये आले तेंव्हा व्यवस्थापकाने भाऊरावास आंघोळ करुन प्रवेश करण्याविषयी सुनावले तेंव्हा सकाळी आंघोळ केली असल्याने आता आंघोळ करणार नाही असा भाऊरावांनी पवित्रा घेतला. व्यवस्थापकाने भाऊरावास जेवण मिळणार नाही असे बजावले तेंव्हा स्वयमपाक घराचा दरवाजा तोडून त्यांनी जेवण मिळविले. या शिस्तभंगाच्या वागणूकीबद्दल भाऊरावांवर  वसतिगृहातून काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली. ही घटना शाहू राजांच्या कानावर गेली. तेंव्हा राजांनी भाऊरावाच्या निवासाची सोय राजवाड्यावर केली.
कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे जैन समाजाचे अधिवेशन झाले. या अधिवेशनात भाऊराव पाटील यांनी हिरीरीने भाग घेतला. तेंव्हा त्यांचे नेतृत्त्वगुण आणि समाजकार्याची आवड पाहून समाजातील थोरामोठ्यांनी  विशेष कौतुक केले. यावेळी माणिकचंद जव्हेरी यांनी भाऊरावांना मुंबईला नेले. तेथे त्यांनी आपली हि-या-माणकांची पेढी भाऊरावांनी सांभाळावी अशी ईच्छा व्यक्त केली. त्याशिवाय भाऊरावांनी हि-यांचा व्यापार करावा यासाठी लागणारे सर्वप्रकारचे सहकार्य करण्याची तयारी दर्शविली मात्र भाऊरावांचे मन कशातच रमले नाही. थोड्याच दिवसात ते पुन्हा कोरेगाव येथे आले. सर्वसामान्याच्या सुख-दु:खात मिसळणारा माणूस हि-या माणकांच्या सहवासात रमणे शक्यच नव्हते. 
सातारा जवळील कोरेगाव येथील भऊसाहेब बर्गे यांनी भाऊरावांना पंचवीस एकर जमिन देऊ केली. त्या जमिनीवर सामुहिक शेतीचा यशस्वी प्रयोग भाऊरावांनी करुन दाखविला. भाऊराव आणि कोरेगाव यांचा विशेष असा  ॠणानुबंध होता. कर्मवीर अण्णांचे वडील पायगौंडा  पाटील हे कोरेगाव येथील मामलेदार कचेरीत नोकरीस होते. एक दिवस घरी पाहुणे आले होते. त्यांच्या पंगतीत भाऊरावही जेवायला बसले होते. भाऊरावांच्या सुविद्य पत्नी लक्ष्मीबाई जेवण वाढीत होत्या. सहज म्हणून पाहुण्यांनी भाऊरावांविषयी चौकशी केली. “सध्या भाऊराव काय करतो ?” तेंव्हा भाऊरावांवर कांहीसे नाराज असणारे वडील त्राग्याने म्हणाले की, “ भाऊराव दोन वेळ ऐतं खातो आणि गावभर हिंडत राहतो.” या वाक्याने लक्ष्मीबाईना आपल्या पतीचा झालेला हा अपमान सहन झाला नाही. त्यांच्या डोळ्यातून अश्रु ओघळू लागले. त्यापैकी कांही थेंब भाऊरावांच्या उजव्या हातावर पडले. यातून जे समजायचे ते भाऊराव समजले. जेवत्या ताटावरुन भाऊराव ऊठले ते तडक पायी चालत सातारला आले.
 सातारला आल्यानंतर भाऊरावाच्या जीवनातील महत्त्वाचे पर्व  सुरू झाले. त्यांनी शिकवणीचे वर्ग सुरु केले.  मराठी , इंग्रजी आणि संस्कृत हे भाऊरावांच्या आवडीचे विषय त्यात त्यांनी थोड्याच दिवसात ‘पाटील मास्तर’ म्हणून नावलौकिक मिळविला. अध्यापनाच्या या कार्यासोबतच त्यांचे सामाजिक कार्यही नेटाने सुरु होते. 
महात्मा फुले यांनी सुरु केलेली ‘सत्यशोधक समाजाची’ मोठी परिषद १९१९ साली सातारा जिल्ह्यातील  काले या गावी भरली होती. त्या परिषदेत ‘रयत शिक्षण संस्था’ स्थापनेची घोषणा भाऊरावांनी केली. १९२४ मध्ये साता-यातील  सोमवार पेठेत  असणा-या आपल्या राहत्या घरी  त्यांनी वसतिगृहाची सुरुवात केली. ज्याप्रमाणे स्त्री शिक्षणाचे काम महात्मा फुले यांनी स्वत:च्या पत्निस शिकवून केले. त्याप्रमाणे अण्णांनी वसतिगृहाची सुरूवात स्वत:च्या घरापासून केली. कोणत्याही सामाजिक कार्याची, संघटनेची वा संस्थेची सुरुवात कार्यकत्याच्या घरापासून होते. ते कार्य कधीच खंडीत होत नाही. कर्मवीर अण्णांनी आपल्या संस्थेस दिलेले ‘रयत’ हे नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून दिले.
लक्ष्मीबाई उर्फ वहिनींवर बालपणी सनातनी विचारांचे संस्कार  झाले होते. सुरुवातीच्या काळात त्या स्पृश्यास्पृशता पाळत . परंतु पुढे भाऊराव अण्णांच्या विचार आणि कार्याची महती त्यांना समजून आली. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी असणारी सनातनी वृत्ती निघून गेली. दिवा पेटवल्यानंतर ज्याप्रमाणे हजारो वर्षाचा  अंधार  क्षणार्धात नष्ट होतो. त्याप्रमाणे अनेक ठिकाणाहून अण्णांनी शिक्षणाच्या निमित्ताने सातारला आणलेली ही मुले विविध जाती-धर्माची असून देखील या मुलांचे मातृत्त्व वहिनींनी स्विकारले. त्यांना मायेच्या ममतेने वागविण्याचा आणि  वाढविण्याचा वसा त्यांनी स्विकारला. संस्थेला  दानशुर गोरगरीब, श्रमिक, कष्टकरी , शेतक-यांकडून अण्णा देणगी गोळा करुन आणत असत. त्या कामासाठी ते अनेक वेळा बाहेरगावी असत. तेंव्हा ह्या वसतिगृहाची जबाबदारी वहिनींवर असे . अनेक वेळा खर्चासाठी पैशाची अडचण असे अशा वेळी वहिनी आपला सोन्याचा दागिना अण्णांकडे देत. तो दागिना अनेक वेळा गहाण ठेवला जाई. मात्र तो पुन्हा कधीच सोडवून आणता आला नाही. एकदा आपल्या गळ्यातील मंगळसुत्राचा शेवटचा दागिना वहिनींनी मोडला. त्यांच्याकडील जवळपास एकशेवीस तोळे दागिने ‘रयत’ साठी वहिनींनी खर्ची घातले.
महात्मा गांधी यांनी जंगल सत्याग्रहाचे आंदोलन छेडले होते. त्याचे लोन साता-यापर्यंत पोहचले होते. म. गांधीच्या प्रभावाने प्रेरित होऊन आंदोलनात सहभागी होण्याचा अण्णांनी निर्णय घेतला तेंव्हा त्या निर्णयाच्या विरोधात त्यांनी ठामपणे भूमिका  घेतली. “ तुम्ही जर आंदोलनात सहभागी झालात आणि तुरुंगात गेलात तर लोक म्हणतील भाऊराव पाटील या कामास भिला आणि  आंदोलनाचे निमित्त करुन त्याने हे वसतिगृहाचे काम बंद केले. अशी नामुष्की तुमच्यावर  येईल.” परंतु ठरल्या निर्णयापासून परावृत्त होतील ते भाऊराव कसले ?  आंदोलनाच्या दिवसी ठरल्याप्रमाणे अण्णा कामेरीच्या जंगल सत्याग्रहाच्या ठिकाणी पोहचले. जे लोक सत्याग्रहात भाषण करतील त्यांना पोलीस शिपाई पकडून गाडीत घालत असत. भाषणासाठी अण्णा उठले. तेवढ्यात जोराचा सोसाट्याचा वारा सुटला पाऊस आला त्यामुळे कर्मवीर अण्णांना भाषण करता आले नाही. पावसाच्या आगमनाने जंगल सत्याग्रहाचे आंदोलन खंडीत झाले. आण्णांना अटक होवू शकली नाही. त्या रात्री अण्णा सातारला आले. घराच्या बंद दरवाज्यावर थाप दिली. भीतभीत वहिनींनी दरवाजा उघडला. साक्षात अण्णांना समोर  पाहून वहिनींच्या डोळ्यातून आनंदाश्रु आले. या अश्रुंनी रयत शिक्षण संस्थेच्या वटवृक्षास खतपाणीच मिळाले.  
सीतेच्या अश्रुंनी रामायण घडले. द्रौपदीच्या अश्रुंनी महाभारत घडले. त्याप्रमाणेच लक्ष्मीबाईंच्या अश्रुंनी रयत शिक्षण संस्था घडली. कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्था उभारत असताना तत्त्व निवडले. जोवर माझ्या देहात प्राण आहे. तोवर पायात पायताण घालणार नाही. डोक्यावर शिरस्त्राण घालणार नाही. आयुष्यभर संस्थेच्या हितासाठीच कार्यरत राहिन. 
अण्णांच्या शैक्षणिक कार्यामुळे महाराष्ट्राच्या दुर्गम भागातील आदिवासी, कष्टकरी , कामगार आणि शेतक-यांच्या मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम झाले आहे. महाराष्ट्र शासनाची एस.टी. बस जिथे पोहचू शकत नाही. अशा ठिकाणी ‘रयत’ ने शाळा, महाविद्यालये ऊभारली. म्हणून महाराष्ट्राचे देशात एक सुधारलेले आधुनिक असे  रुप दिसते . देशाच्या  शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय , ऐतिहासिक आणि आर्थिक क्षेत्रात महाराष्ट्राने उंच भरारी घेतली आहे. याचे बरेचसे श्रेय ‘रयत’ शिक्षण संस्थेस द्यावे लागते. ज्या जंगली भागात  रयत पोहचू शकली नाही. अशा दुर्गम भागात नक्षलवादी तयार झाले आहेत. यावरुनच ‘रयत’ चे मोठेपण आपणास मान्य करावे लागते. कर्मवीर अण्णांच्या कार्याची महती लक्षात घेऊन  भारत सरकारने त्यांना १९५९ साली ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन गौरव केला.  तर पुणे विद्यापीठाने १९५९ मध्येच शिक्षण क्षेत्रातील  डी.लिट. ही अतिउच्च पदवी प्रदान केली. तर जनतेने त्यांना ‘कर्मवीर’ ही सन्मानाची पदवी बहाल केली. तेंव्हापासून भाऊराव पाटील इतिहासात ‘कर्मवीर अण्णा’ या नावांनी ओळखले जाऊ लागले. अशा या थोर शिक्षण महर्षिंची पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये ९ मे १९५९ रोजी प्राणज्योत मालवली. 
अशा या थोर शिक्षण भगिरथास त्यांच्या एकशे पंचविसाव्या जयंती निमित्त शतश: प्रणाम !