Revision 146558 of "शुभ्र बुधवार व्रत/बुधाची जन्मकथा" on mrwikisource{{शीर्ष
| शीर्षक = {{लेखनाव}}
| साहित्यिक =
| विभाग =
| मागील = [[शुभ्र बुधवार व्रत]]
| पुढील = [[शुभ्र बुधवार व्रत/बुधाची विवाहकथा]]
| वर्ष =
| टिपण =
}}
<poem>
श्रावण महिन्यातल्या अष्टमीला अनुराधा नक्षत्र असताना बुधवारी बृहस्पतीची पत्नी सौ. तारा हिला चंद्राप्रमाणे तेजस्वी पुत्र झाला. तोच हा बुध.
बुध चंद्रासारखा तेजस्वी होता. कारण त्याचा चंद्रापासून राहिलेला गर्भ तारेच्या उदरात वाढला होता.
म्हणजे जरा घोटाळ्यात पाडणारी आहे ही कथा.
देवांचा गुरू हा पुरोहितपणा करणारा बृहस्पती. देवांकडील धार्मिक कामे गुरू करीत असे. गुरू जातीने ब्राह्मण, सात्त्विक आणि नेहमी जीव आणि शिव ह्यांचे मनन करणारा. ईश्वराचे सतत चिंतन करणारा. या गुरूची पत्नी तारा.
तारा ही अत्यंत रूपवती होती. इंद्रलोकातील मेनका, रंभा, उर्वशी इत्यादी अप्सरा तिच्यापुढे अगदी फिक्क्या होत्या. इतकी तारेची शरीरसंपदा कमनीय होती. तारेचा प्रत्येक अवयव यथाप्रमाण होता. तिचा वर्ण गौर, नाक चाफेकळीसारखे, दात डाळिंबाच्या दाण्याप्रमाणे, ओठ पिकलेल्या तोंडल्याप्रमाणे लालचुटुक; केशकलाप कमरेपर्यंत रुळणारा; डोळे हरणाच्या डोळ्यांप्रमाणे आणि सदा सोळा वर्षांची तरुणी अशी तारा दिसे.
अशी ही तारा एकदा अंघोळ केल्यावर तलावाच्या पाळीला उन्हात आपले केस वाळवीत होती . तलावात तिचे प्रतिबिंब पडलेले होते. हे प्रतिबिंब चंद्राने पाहिले आणि चंद्र देहभान हरपून, प्रतिबिंब ज्या स्त्रीचे होते, त्या स्त्रीवर मोहून गेला. आणि तारेच्या पुढ्यात जाऊन उभा राहिला !
चंद्राला पाहून तारेचेही मन बैचैन झाले.
वास्तविक, चंद्राला ताराचा व ताराला चंद्राचा मोह व्हायला नको होता. कारण त्या दोघांत शिष्य आणि गुरुपत्नी असे नाते होते. कारण चंद्र बृहस्पती गुरूचा विद्यार्थी होता, शिष्य होता ! तथापि तारा आणि चंद्र परस्परांवर मोहित झाले. विकाराने त्यांचा विवेक भ्रष्ट झाला.
आणि मग, "विवेक भ्रष्टानां भवति विनिपातः शतमुखैः" या न्यायाने चंद्राने ताराला आपल्या महालात ठेवले. ताराही चंद्राच्या महालात रमली. तिला आपल्या पतीची म्हणजे गुरुदेव बृहस्पतींची आठवणही होईना !
त्यामुळे गुरू अस्वस्थ झाले. त्यांचे स्नानसंध्येकडे लक्ष लागेना, ध्यानधारणेकडे चित्त लागेना. त्यांच्या अंतश्चक्षूला शिव दिसेना. हे गुरूच्या आश्रमातील शिष्यांना बघवेना; म्हणून एक शिष्य चंद्राकडे गेला आणि आपल्या गुरूची झालेली स्थिती त्याने चंद्राला सांगितली. चंद्राने आपल्या गुरुबंधूला हाकलून दिले ! शिष्य हिरमुसला होऊन बृहस्पती गुरूच्या आश्रमाकडे परतला.
मग गुरुदेव फार संतापले, ते स्वतः चंद्राकडे गेले. ते त्याला म्हणाले, "मूर्खा, वागायचे कसे हे तुला कळत नाही?" गुरुभार्या ही मातेप्रमाणे असते,ही शिकवण विसरून तू तिचा स्वतःच्या पत्नीप्रमाणे उपभोग घेतोस. हे पाप तू कोठे फेडशील !"
चंद्र म्हणाला, "तू माझा गुरू होतास; पण तुझ्या अशा मूढपणाच्या भाषणाने तू त्या पदाला आता नालायक ठरला आहेस."
गुरू म्हणाले, " अस्से काय!"
चंद्र म्हणाला, ' नाहीतर काय ! जी स्त्री खुशीने मजकडे आली, तिला वार्यावर सोडून देणे हा काय पुरुषार्थ झाला. तिचे मन तृप्त झाले की मला तिची मुळीच वांच्छा नाही. तिला मजकडे राहण्याची सक्ती न करता तुझ्याकडे जायला मी सांगेन. आणि असे पाहा गुरुजी, स्त्री ऋतुस्नानानंतर शुद्ध होते, असे तुम्हीच मला सांगितले आहे; जेव्हा ती पुनश्च ऋतुस्नात होईल, तेव्हा ती तुमचीच होईल."
गुरू म्हणाले, " हे चंद्रा, तू धर्म जाणतोस हे मला मान्य आहे. तथापी अठ्ठावीस शुभ अशा दक्षकन्यका तुझ्या पत्नी असताना तू माझ्या भार्येचा लोभ धरू नकोस."
चंद्र म्हणाला, " आपल्यावर प्रेम करणार्या स्त्रीबरोबर संसार करण्यात मजा आहे. म्हणून मी ताराला तुमच्याकडे नाही पाठवणार !"
मग गुरू आश्रमाकडे न जाता इन्द्राकडे गेले. इन्द्राने गुरूला मदत करण्याचे आश्वासन दिले.
चंद्र व इंद्र यांची लढाई जुंपली. गुरू आणि शुक्र यांचे वाकडे होते. कारण गुरू हा देवांचा पुरोहित होता. आणि शुक्र दैत्यांचा पुरोहित होता. देव व दैत्य यांचे वाकडे असल्याने गुरू-शुक्रामध्येही वैर म्हणून शुक्र चंद्राच्या बाजूने लढाईला उठला.
पुष्कळ दिवस लढाई झाली. ब्रह्मदेवाने चंद्राला गुरुभार्या सोडण्यास सांगितली. अत्रिऋषींनी शुक्राचार्यांना निरोप धाडला. तेव्हा शुक्राचार्यांनी चंद्राला गुरुपत्नीला सोडण्यास सांगितले, आणि चंद्राने गुरुपत्नीला आपण होऊन गुरूच्या स्वाधीन केले.
या अवधीत तारा गरोदर राहिली होती. तिला पुत्र झाला. तो गुरूच्या घरी आल्यावर झाला. गुरूने या पुत्राचे नाव बुध ठेवले. अशी आहे बुधाची जन्मकथा.
<poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:व्रते]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikisource.org/w/index.php?oldid=146558.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|