Revision 3207 of "अन्नपूर्णेची कहाणी" on mrwikisource{{header
| शीर्षक = {{लेखनाव}}
| साहित्यिक =
| विभाग =
| मागील =
| पुढील =
| वर्ष =
| टिपण =
}}
<poem>
काशी नगरीत धनंजय नावाचा एक विद्वान ब्रह्मण राहत होता. त्याच्या बायकोचे नाव होते सुलक्षणा. त्यांच्या घरात अठराविश्वे दारिद्र्य होते. एक दिवस बायको बोलल्यामुळे धनंजयाला वाईट वाटले. व त्याने शंकराची तपश्चर्या करावयाला सुरुवात केली. तीन दिवस गेल्यावर शंकराने त्याच्या कानाजवळ 'अन्नपूर्णा, अन्नपूर्णा', अन्नपूर्णा,' असे शब्द उच्चारले. त्याला त्याचा अर्थ कळला नाही, म्हणुन त्याने पुन्हा तपश्चर्येला सुरुवात केली. तेव्हा शंकरांनी त्याला रात्री दृष्टान्त दिला, "मुला, तू पूर्व दिशेला जा. तुझे मनोरथ पूर्ण होतील." दुसर्या दिवशी तो पूर्वेकडे निघाला. बरेच दिवस गेल्यावर एका पौर्णिमेच्या रात्री तो सरोवराजवळ पोहोचला. तेथे हजारो सुंदर अप्सरा एक व्रत करीत असलेल्या त्याला दिसल्या. त्याने त्यांना विचारले. "हे तुम्ही काय करता?"
अप्सरा म्हणाल्या, "आम्ही अन्नपूर्णेचे व्रत करीत आहोत. हे व्रत कोणीही करू शकतो.२१ दिवसांसाठी २१ गाठी असलेला दोरा घ्यावा. एकवीस दिवस उपास करावा. एकवीस दिवस जमत नसल्यास एक दिवस तरी उपवास करावा आणि हेसुद्धा शक्य नसेल, तर कहाणी ऐकून प्रसाद भक्षण करावा. उपवास करून कहाणी ऐकायला कोणी मिळाले नाही, तर पिंपळाचे पान समोर ठेवावे, दिवा ठेवावा आणि शंकर-पार्वतीला साक्षी ठेवून कहाणी ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये. चुकीने अन्नग्रहण झाल्यास दुसर्या दिवशी परत उपवास करावा. व्रत करावयाच्या दिवशी रागावू नये. खोटे बोलू नये. हे व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी मिळते, लुळ्याला पाय येतात, निर्धनाला पैसा मिळतो, पुत्र नसलेल्यांना पुत्रलाभ होतो. जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्या प्राप्त होते व जीजी इच्छा धरून हे व्रत करील त्याची तीती इच्छा पूर्ण होते."
ब्राह्मण म्हणाला, "बाई, मला खायला अन्न नाही, ल्यायला वस्त्र नाही, विद्येचे नाव नाही. मी एक गरीब दुःखी ब्राह्मण आहे. आपण मला व्रताचे सूत द्याल काय?"
अप्सरा म्हणाल्या, "देऊ, पण तू त्याचा अपमान करता कामा नये. त्याची हेळसांड करता कामा नये. हे घे ते पवित्र सूत."
धनंजयाने मग हे व्रत केले. व्रत पुरे झाल्यावर सरोवरातून २१ पायर्या असलेली सोन्याची शिडी वर आली. धनंजय शिडीवरून खाली उतरू लागला. शिडीवरून खाली उतरल्यावर त्याला अन्नपूर्णेचे मंदिर दिसले. सोन्याच्या सिंहासनावर अन्नपूर्णा बसली होती आणि शंकर दोन्ही हात जोडून याचकाप्रमाणे तिच्यासमोर उभे होते. किन्नरी देवीवर छत्रचामरे ढाळीत होत्या. यक्षस्त्रिया सशस्त्र पाहारा करीत होत्या. ते पाहून आश्चर्यचकित झालेला धनंजय पुढे गेला आणि त्याने माता अन्नपूर्णेचे पाय धरले.
देवी हसून म्हणाली, 'वत्सा धनंजया, तू माझे व्रत केले आहेस. मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. तू सुखी होशील. सारे जग तुझी वाहवा करील. तुला काही कमी पडणार नाही.'
देवीने आपल्या वरदहस्त धनंजयाच्या डोक्यावर ठेवला. त्याबरोबर विद्यादेवी त्याच्या जिव्हेवर नाचू लागली. त्याला अत्यानंद झाला. त्यानेच त्याला मूर्च्छा आली. शुद्धीवर येऊन पाहतो तो आपण काशीविश्वेश्वराच्या मंदिरात आहोत असे त्याला आढळून आले. तो घरी गेला, सर्व हकिकत बायकोला सांगितली. मातेच्या आशीर्वादाने त्याच्या घरी भरभरून संपत्ती येऊ लागली. त्याचे दुःख, दारिद्र्य दूर झाले. त्याच्या मानसन्मान वाढल्या. त्याचे नातेवाईक त्याला मान देऊ लागले. पुढे बायकोला मूल होत नाही म्हणून त्याने दुसरे लग्न केले आणि तो निराळे घर बांधून राहू लागला.
एके दिवशी सुलक्षणा आपल्या नवर्याला म्हणाली, " महाराज, आपल्याशी माझे एकच मागणे आहे. आपणाला हे वैभव आणि सुख मिळाले आहे ते अन्नपूर्णेच्या प्रसादाने मिळाले आहे तरी आपण तिचे व्रत सोडू नये."
तिचे बोलणे ऐकून तो तिच्याबरोबर व्रत करण्यास बसला. दुसरीला त्यातले काहीच माहिती नव्हते. ती आपल्या नवर्याची वाट पाहत बसली. एक दिवस झाला, दोन झाले. असे १८ दिवस झाले तरी धनंजय परतला नाही. शेवटी तिला समजले की, आपला नवरा आपल्या सवतीकडे गेला आहे. तो तिच्याकडे अठरा दिवस राहिला आहे, तिच्या अंगाचा तिळपापड झाला. ती रागाने लाल होऊन तिथे गेली आणि तिने धनंजयाची बकोटी धरून त्याला घरी आणले. व्रताचे अजून तीन दिवस शिल्लक होते. घरी आल्यावर धनंजय रात्री झोपी गेला. बायकोला त्याच्या हातात असलेला दोरा दिसला. तिने तो तोडला आणि चुलीत जाळून टाकला. अन्नपूर्णा कोपली. त्यामुळे धनंजयाचे घर सामानासुमानासकट जळून भस्म झाले. सुलक्षणा समजली की, हा देवीचा कोप आहे. तिने धनंजयाला आपल्या घरी बोलावले. सवत मात्र आपल्या माहेरी निघून गेली.
सुलक्षणेच्या सांगण्यावरून धनंजय परत सरोवराकाठी गेला. त्याने पुन्हा व्रत केले. पहिल्याप्रमाणे शिडी वर आली. तो देवीच्या मंदिरात गेला. त्या परत आलेला पाहून देवीचे नोकर त्याला मारावयास धावले. त्यावर देवी म्हणाली, "थांबा, त्याला मारू नका. तो ब्राह्मण आहे. तो अवध्य आहे. त्याने माझे व्रत केले आहे," नंतर देवी त्याच्याकडे पाहत म्हणाली, "मला सर्व काही समजले आहे. जा, ही माझी सोन्याची मूर्ती घे. हिची दरोरज पूजा कर. तू फिरून सुखी होशील. माझा तुला आशीर्वाद आहे. तुझी प्रथम पत्नी सुलक्षणा हिने माझी मनोभावे सेवा केली आहे. व्रत केले आहे. तिला सर्वगुणसंपन्न असा मुलगा होईल."
प्रसन्न अंतःकरणाने धनंजय घरी परतला. तो दररोज भक्तिभावाने अन्नपूर्णेचा पूजापाठ करू लागला. पुढे काही दिवसांनी सुलक्षणेला मुलगा झाला. सारे गावकरी चकित झाले.
धनंजय त्यांना म्हणाला, "बाबांनो, मी माता अन्नपूर्णेचे व्रत केले. देवी प्रसन्न झाली आणि तिच्या आशीर्वादाने आजचे वैभव, मानसन्मान आणि पुत्रलाभ मला झाला."
ते ऐकून त्या गावातील श्रीमंत शेटजीने देवीचे व्रत केले. त्यालाही मुलगा झाला. त्याने अन्नपूर्णेचे मंदिर बांदले. मोठ्या सामांरभाने त्याने मंदिरात देवीची स्थापना केली. धनंजयालाच तेथे पुजारी नेमले. आता धनंजय आपल्या बायकोमुलांसह त्या मंदिरात राहू लागला. त्याला खूप धनदौलत मिळू लागली.
इकडे दुसर्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला. सर्व घरदार चोरांनी लुटून नेले.तिला पोटासाठी दारोदार भीक मागावी लागली. तिच्या अन्नान्नदशेची हकिकत सुलक्षणेच्या कानावर आली. तिने तिला घरी आणले. न्हाऊमाखू घालून चांगले कपडे दिले, आणि तिला आपल्याजवळ ठेवून घेतले. मातेच्या कृपाप्रसादाने धनंजय, सुलक्षणा आणि त्यांचा मुलगा यांना सुख आणि मानमान्यता मिळाली. ती सर्व सुखी झाली. तसेच सुख आपणा सर्वांना देवीच्या कृपाप्रसादाने मिळो.
तात्पर्य हेच की, आपण जशी करणी करतो, तसेच फळ आपल्याला मिळते. आपण चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते आणि वाईट कर्म केले तर त्याचे फळ दुःख, दारिद्रय, नाना तर्हेच्या व्याधिउपाधींनी भोगावे लागते.
<poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikisource.org/w/index.php?oldid=3207.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|