Revision 3208 of "मंगळागौरी व्रतकथा" on mrwikisource

{{header
 | शीर्षक      = {{लेखनाव}}
 | साहित्यिक     = 
 | विभाग  =
 | मागील =   
 | पुढील       = 
 | वर्ष       = 
 | टिपण      = 
}}
<poem>
श्रीगणेशाय नम: ॥

श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरूभ्यो नम: ॥
वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा ॥

स जयति सिंधुरवदनो देवो यत्पादपंकजस्मरणम् ।
वासरमणिरिव तमसां राशीन् नाशयति विघ्नानाम् ॥
नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमम् ।
देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ॥
सरस्वति नमस्तुभ्यं वरदे विश्वरूपिणि ।
कथारंभं करिष्यामि सिद्धिर् भवतु मे सदा ॥
श्रीगणेशाय नम: ॥


प्रारंभीं श्रीविघ्नहरा । हे विघ्नांतका मोरेश्वरा ।
आतां वरदपाणी धरा । शरण मी तव चरणांते ॥१॥
तुझ्या वामदक्षिणीं आहेत । ऋद्धि सिद्धि बुद्धि शक्ति स्थित ।
हे विनायका तुज संबोधित । विविध नामें करूनिया ॥२॥
तुज असे लड्डुकाची प्रीती । हे लंबोदरा गणपति ।
तुज लड्डुकनैवेद्य जे अर्पिती । तयासी तूं प्रसन्न इभवक्त्रा ॥३॥
आतां ऎकावी माझी विनंती । द्यावी मातें चतुरमति ।
जेणें प्रकाश निश्चितीं । व्हावया कथानिर्माणी ॥४॥


हे मंगलागौरी आख्यान । श्रवणा अतिरुचिर जाण ।
जेणें दु:खसंकटनिवारण । होऊनि पतिसौख्य लाभतसे ॥५॥
असो ऎसें विग्लापन । मनोगत करूनि श्रवण ।
मातें वदला गौरीनंदन । बहु विस्तार पुरे आतां ॥६॥
आतां तुझ्या करीं विराजूनि । कथा वदितों मी श्रोतयांलागुनि ।
घेऊनि करीं लेखनी । प्रारंभावे त्वरित आतां ॥७॥
एकदा युधिष्ठिरानें भलें । श्रीकृष्णासि प्रश्‍निलें ।
बहुत कथानकासि ऎकिलें । आपणांकडून गोविंदा ॥८॥


आतां पुत्र आणि आयुष्यें । देईल ऎसें व्रत कैसें ।
कथन करावें जगता ऎसें । श्रवणीं उत्कंठा मज लागे ॥९॥
श्रीकृष्ण म्हणे हे पंडुनंदना । अवैधव्यकर ऎसें हे व्रत जाणा ।
सावधान मनें करी श्रवणा । कथा वर्ते अति पुरातन ॥१०॥
कुंडिन नामें प्रसिद्ध नगरी । तेथें धर्मपाल वैश्य वास करी ।
ज्याची प्रीति असे विप्रांवरी । मोठा धनवान असे तो ॥११॥
भार्येसहित वर्तमान । असे परी तो संतानहीन ।
पुत्र नाही आपणांसि म्हणून । मनीं अति व्याकुळ असे ॥ १२ ॥


असो नित्य तये सदनीं । जटाधारी भस्मरुद्राक्ष धारण करूनि ।
भिक्षुक दर्शन देई सर्वांलागूनि । परी न भिक्षा घेई तया घरीं ॥१३॥
वैश्यभार्या म्हणे पतिलागुनि । भिक्षुक येतो आपुल्या सदनीं ।
परी न स्वीकारी भिक्षेलागुनि । मम चित्त व्याकुळ वर्ते स्वामी ॥१४॥
धर्मपाल म्हणे हे प्रिये ऎक । घेऊनि सुवर्ण हातीं अंगणीं नावेक ।
साधु येताचि सदनीं देख । सुवर्णभिक्षा वाढे तयालागी ॥१५॥

ऎकूनि धर्मपालाचें वचन । भार्या वर्ते तैसेंचि जाण ।
तंव भिक्षुक होऊनि क्रोधायमान । अपत्यहीन होशील ऎसा शाप देई ॥१६॥


ऎकूनि तयाची शापवाणी । वैश्यभार्या होऊन दीनवाणी ।
विनवी तया भिक्षुलागुनि । उ:शाप मजसी द्यावा हो ॥१७॥
ऎसें करूनि दीनभाषण । वैश्यभार्या तया चरणीं लीन ।
भिक्षुक वदे तियेलागून । मम आज्ञा श्रवण करी ॥१८॥
कन्ये तव पतीस कथन करी । नीलवस्त्रें परिधान करी ।
बैसूनि नील वारुवरि । जावें काननीं घोर मार्गे ॥१९॥
जेथें वारुसि अटक भरे । तेथें खणावें त्वां सत्वरें ।
तंव देखशील देवालय त्वरें । जें वर्ते अतिरमणीय ऎसें ॥२०॥



नाना पुष्पें नाना पक्षी । नाना पशु नाना वृक्षीं ।
शोभा तयाचि अति लक्ष्यीं । जेथें वर्ते स्वयें जगदंबा ॥२१॥
करितां तियेचें आराधन । ती करील तुझें उद्धरण ।
ऐसें भिक्षूंचे ऎकूनि भाषण । मुहुर्मुहु: वंदी तया वैश्यभार्या ॥२२॥
परी भिक्षुक होता अंतर्धान । वैश्यभार्या वदे स्वपतिलागून ।
आदरभाव मनीं धरून । भिक्षुकभाषण तया कथन करी ॥२३॥
धर्मपाल वैश्य स्वयें तत्क्षणीं । नीलवस्त्रें परिधान करूनि ।
नीलवारुवरीं स्वार होऊनि । रिघे वनीं तत्काळ ॥२४॥


मार्गी देखे अपूर्व देखावा । सर्प सिंह हिंस्र पशूंचा मेळावा ।
थोर वृक्षांचा समुदाय बरवा । मध्यें शोभायमान सरोवर असें ॥२५॥
जेथें रक्‍तकृष्णवर्णी कमलें । जें चक्रवाक पक्षियांनी शोभलें ।
धर्मपालें तये तडागीं स्नान केलें । पितृतर्पणादि करी तत्काळ ॥२६॥
पुन्हा अश्वारूढ होऊनि । रिघे तो घोर वनीं ।
मध्यें अश्व अडखळे काननीं । तव तो खालीं उतरे ॥२७॥
तेथें भूमि करितां खनन । देखिलें देवालय शोभायमान ।
मौक्तिकमाणकें रत्‍नखचित जाण । देखूनि वैश्य मनीं विस्मय पावे ॥२८॥



घेऊनि वस्त्रें चंदन अलंकार । पुष्पें धूप दीप षोडशोपचार ।
षड्रस पक्वान्नांचा नैवेद्य थोर । फलतांबूलसहित सिद्ध करी ॥२९॥
ध्याऊनि सगुण देवीध्यान । गुप्त रीतीनें बैसे आड करून ।
देवी गर्भगृहातून बाहेर येऊन । पाहे समग्र संभार तो ॥३०॥
म्हणे ऎशा अगम्य स्थळीं । कैसी हो अद्‌भुत सामग्री सिद्ध झाली ।
ज्यानें ही असे सिद्ध केली । त्यासी वर देईन अपूर्व ऎसा ॥३१॥
देवीचें प्रिय भाषण ऎकूनि । धर्मपाल ठाकला पुढें होऊनि ।
म्हणे हे भगवति जगज्जननि । मजपाशीं बहुत धन संपत्ति असे ॥३२ ॥


तरी समस्त पितरांना तारक ।सुसंतान होऊ दे मजसि एक ।
जेणेंकरूनि मत्सदनीं देख । भिक्षुक करील अन्नग्रहण ॥३३॥
ऎकूनि धर्मपालाचे दीन भाषण । देवी वदतसे तयालागून ।
तव प्रारब्धी न अपत्य जाण । परी मी कृपा करीन तुजवरी ॥३४॥
तरी मागावें आतां मजकारण । कन्या पाहिजे तरी वैधव्य जाण ।
पुत्र होय तरी तो आपण । अल्पायुषी होई निश्चयें ॥३५॥
अथवा असूनि तो दीर्घायुषी । परी अंध होईल नेत्रदोषी ।
ऐकूनि धर्मपाल वदे तिसी । अल्पायुषी परी असावा सूज्ञा ॥३६ ॥


तेणें माझी कृतकृत्यता । सद्य:कालीं पितर नरकीं असतां ।
त्यांसि उद्धार होई तत्त्वतां । तव कृपाप्रसादे करूनिया ॥३७॥
ऎकूनि वदे देवी त्यासी । गणपति असे जो मज पार्श्वी ।
चढूनि त्याचें नाभिप्रदेशीं । घ्यावें आम्रफल त्वां तोडोनि ॥३८॥
ऎकूनि ऎसें देवीभाषण । करी गणेशनाभिसि आरोहण ।
एकाऎवजी बहुत फळें जाण । घेई तोडूनि झडकरी ॥३९॥
परी एकचि फल लाभे तयालागून । घरी परते वस्त्रीं फल बांधून ।
भार्येसि करी तें फल अर्पण । ते भक्षण करी महानंदा ॥४०॥


पतीशी होतां रममाण । पतिव्रता करी गर्भधारण ।
नवमास होतां संपूर्ण । उत्तम पुत्रफळ प्रसवतसे ॥४१॥
सहावे दिनीं षष्ठीपूजन । द्वादशीदिनीं होऊनि नामकरण ।
शिव ऎसें नामाभिधान । सर्वजण पाचारिती तया ॥४२॥
सहावें मासीं अन्नप्राशन । तृतीयवर्षी केलें चूडाकर्म ।
अष्टमवर्षी करितां उपनयन । धर्मपाल बहुत संतोषला ॥४३॥
दशमवर्षी बालकमाता । पतीसि विनवी ती कांता ।
सुमुहूर्ती या बालकासी आतां । विवाह करूनि द्यावा तुम्ही ॥४४॥


धर्मपाल वदे त्यावरी । पूर्वी म्या संकल्पिले नारी ।
काशीयात्रा घडवावी निर्धारी । या बालकाकारणें ॥४५॥
ऎसा स्वनिश्चय बोलून । धर्मपालें स्वशालकासी केलें पाचारण ।
तयासह शिवासी धाडिलें जाण । काशी महायात्रा करावया ॥४६॥
घेऊनि भगिनीपुत्रासि । बहुत धन समागमेसि ।
शालक प्रवर्तला काशीयात्रेसि । बहुत दानधर्मा योजिलें ।४७॥
दोघे पातले प्रतिष्ठापुरीं । तंव तेथें देखिल्या नारी ।
त्यामध्यें गौरवर्णी सुशीला कुमारी । मैत्रिणीसवे तंडे ती ॥४८॥


कलहांत कलह होतां वृद्धि । सखी सुशिलेसी 'बोडकी' ऎसें संबोधी ।
तंव सुशीला न होता क्रोधी । मंजुळवाणी बोले ती ॥४९॥
हे सखी तू व्यर्थ शिणसि । आम्हां न वैधव्यप्राप्ति कल्पांतेसि ।
मम मात मानवतीसी । मंगलागौरी व्रत साध्य असे ॥५०॥
त्या व्रतप्रभावेकरून । आमच्या सर्व आप्तस्त्रिया भोगिती अहेवपण ।
मीही असे मानवतीची कन्या जाण । आजन्म सौभाग्यपण भोगीन मी ॥५१॥
सुशीला म्हणे हे सुंदरी । त्या व्रताचा प्रभाव श्रवण करी ।
जेथें धूपदीपें पूजिली मंगलागौरी । तेथें सर्वत्र सुख नांदतसे ॥५२॥


ऎकूनि सुशीलेचे मधुर भाषण । शालक विचार करीतसे मनोमन ।
जरी या कन्याहस्तें अक्षतारोपण । मम भाच्यावरी होईल तें ॥५३॥
तरी हा बालक शतायुषी । होईल ऎसा विचार मानसी ।
करूनि न्याहाळी सुशीलेसी । प्रफुल्लित नयनेंकरूनिया ॥५४॥
जंव सुशीला पातली स्वगृहास । तंव मामाभाचांनी केला रहिवास ।
साधूनि सुशीलेचा संनिधवास । उत्तम सरोवरीं आश्रम केला ॥५५॥
यथावकाश सुशीला उपवर । तत्पिता हरीसि सुचला विचार ।
कन्येसि योजावा हर हा वर । जो गृहासंनिध राहतसे ॥५६॥


परी हरासि प्रकृत्यस्वस्थता बहुत । देखूनि मातापिता होती चिंताक्रांत ।
विचार मांडिला अद्‌भुत । छलकपट पाणिग्रहणाचा ॥५७॥
दोघे विनविती शिवमातुला । घडला वृत्तांत कथन केला ।
विवाहापुरता शिव आम्हाला । देऊनि उपकृत करावें आम्हा ॥५८॥
ऎकूनि त्यांची नम्र विनंती । मातुलें शिव अर्पिला तयाप्रति ।
भरतां विवाहघटिका निश्चिती । शिवें पाणिग्रहण केलें सुशिलेचें ॥५९॥
शिवें रजनी क्रमिली तयें ठायीं । तंव रात्रीं स्वप्नी येऊनि लवलाही ।
मंगलागौरी सुशिलेसी बोलली पाही । सुशिले सावधान होई तूं ॥६०॥


तव पतीस दंश करण्या जाण । भुजंग पातला अतिदारुण ।
जागृत होऊनि तयाकारण । दुग्धोपाहार अर्पी बाळे तूं ॥६१॥
दुधाजवळीं घट स्थापन करी । भुजंगे होऊनि दुग्धाहारी ।
घटीं प्रवेशितां मुखावरी । कंचुकीबंधन करी तू ॥६२॥
तो घट मातेसी वायन करीं । ऎसें स्वप्नीं वदतां गौरी ।
सुशीला जागृत होऊनि झडकरी । भुजंगासी अवलोकन करीतसे ॥६३॥
गौरीआज्ञेचें करूनि पालन । पुन्हा जाहली ती निद्राधीन ।
तंव पतीसि जागृती येऊन । क्षुधापीडित जाहलो म्हणतसे ॥६४॥



तंव लड्डकपूर्ण सुवर्णभोजन । सुशिले केलें पतिअर्पण ।
सेवूनि उपाहार संपूर्ण । स्वांगुलीयक देई सुशिलेसि ॥६५॥
घेऊनि सुवर्णपात्राची खूण । तो ठेवी जत करून ।
प्रात:काल होताचि जाण । स्वगृहीं शिव परतला ॥६६॥
सुशिलेने तो भुजंगघट जाण । मातेसि अर्पिला वायन म्हणून ।
आंत मौक्तिकहार विलोकून । माता संतुष्ट झाली असे ॥६७॥
तो मुक्ताहार सुशिलेसी । देऊनि उपायन वधुवरांसि ।
क्रिडाकाल दुसरे दिवशी । प्राप्त होता नवल घडे ॥६८॥



देखूनि हरासि सुशीला । वदे हा वर म्यां न वरिला ।
मी न क्रीड करी या बाला । मम अंतरीं न येई हा ॥६९॥
होऊनि चिंताक्रांत मातापिता । जामातशोध मांडिला तत्त्वतां ।
अन्नसंतर्पणाचेनि मिषें आतां । येईल परतोनि आम्हांजवळी ॥७०॥
अन्नछत्रांत ऎसी प्रथा । सुशीला मुद्रिकेसह पादप्रक्षालन करितां ।
उदक घाली तिची माता । हरी पुष्प गंध अर्पण करीतसे ॥७१॥
तैसाचि तांबूल अर्पण करी । ऎसी देखतां वेवस्था भारी ।
अतिथी भोजन घेऊन सत्वरी । मार्गस्थ होऊ लागले ॥७२॥


मामाभाचे करिती काशीयात्रा गमन । दानधर्म करूनि घेती आशीर्वचन ।
शिवासी लाधलें चिरंजीवपण । दानधर्मपुण्यें करूनिया ॥७३॥
काशींत उभयता विश्वेश्वराधन । करूनि निघाले स्वगृहाकारण ।
तंव मार्गी शिवासी वाटे बेचैन । निधनकाल समीप पातला ॥७४॥
यमदूत पातले तये ठायीं । प्राण हरण करतां लवलाही ।
युद्ध घडलें अद्‍भुत पाही । तयांसवे मंगलागौरीचे ॥७५॥
यमदूता पराभवूनि लवलाही । शिवप्राण अर्पिले तये ठायीं ।
विचित्र युद्ध स्वप्नी पाही । शिव जागृत जाहला ॥७६॥


केलें मामासी स्वप्नकथन । तंव तो गुप्तवाणी मनीं ठेवून ।
मातापिताभेटीची आस धरून । शिव मार्गक्रमण करीतसे ॥७७॥
पूर्वगृहाश्रमी पातले उभयता । भोजनीं अनुसंधान करितां ।
हरिदासींनी तयासी विलोकितां अतिविस्मित त्या झाल्या मनीं ॥७८॥
विनविती त्या उभयतांसि । अन्नछत्रासि चलावें अविलंबेसि ।
तंव ते वदती आग्रहासि । न करावें आम्हांकारणें ॥७९॥
आम्ही यात्रिक होऊनि असतां । न करूं कधी परान्नवार्ता ।
दासींनी वर्तमान कथन करितां । मातापिता बहु संतोषले ॥८०॥


सुशिलेच्या मातापित्यांनी झडकरी । पाठविली सवें बहुसामग्री ।
मामाभाचेसि निमंत्रण देऊनि झडकरी । आणलें अति गौरव करूनिया ॥८१॥
करूनि मातुलपूजन । हरीनें आरंभिलें शिवाराधन ।
सुशीला करीतसे पादप्रक्षालन । देखूनि मनीं लज्जित झाली ॥८२॥
संकोचूनि बोले मातेसि । हाचि वर असे नेमस्त मसी ।
ऐकूनि हरी कन्यावार्तेसि । प्रश्न करी शिवाप्रती ॥८३॥
आपण दिसतां सुशिलेचे पती । परि व्हावया संदेहनिवृत्ति ।
आपणाकडे खूण निश्चिती । असेल तरी दाव आम्हा ॥८४॥


तंव शिवें आणिलें सुवर्णभाजन । देखूनि आदर करिती सर्वजण ।
सुशिलेसी करूनि तया स्वाधीन । बहुत रत्‍नवस्त्रें दिली तया ॥८५॥
कन्येसि घेऊनि उभयता । मार्गक्रमण करीत असता ।
श्रावणमास पातला तत्त्वतां । करी ती मंगलागौरीव्रत आपण ॥८६॥
पुढे चार कोस मार्गक्रमण । सुशिलेसि झाले स्मरण ।
म्हणे मंगलागौरी विसर्जन । केलेंचि पाहिजे अवश्य तें ॥८७॥
ऎसें बोलूनि परत आली । ज्यास्थळीं गौरीपूजा केली ।
आरती विसर्जन करूनि त्याकाळीं । पुन्हा मार्ग क्रमिति ते ॥८८॥


येता कुंडिनपुरानजिक । विस्मित होती सर्व लोक ।
धर्मपालासि वार्ता कथिती एक । पुत्र, स्नुषा, शालक आगमनाची ॥८९॥
आपुले प्रिय मातपितर । शिवें वंदिलें वारंवार ।
सुशीलाही करूनि नमस्कार । सासुपाशी उभी ठाके ॥९०॥
तंव शिवमात म्हणे सुशीलें। ज्याव्रतें मम पुत्रा आयुष्य दिलें ।
तें मजसि कथन करी बाळे । सुशीला म्हणे मज ज्ञात नाही ॥९१॥
मी तंव जाणे माता पिता । गौरी आणि मम भर्ता ।
याविणें दुजी अन्य वार्ता । न कदापि मज ठावे ॥९२॥


ऎसें बोलोनि सुशीला झडकरी । महाप्रसाद सेवन करी ।
श्रीकृष्ण म्हणे धर्मा श्रवण करीं । मंगलागौरी माहात्म्य ऎसें असे ॥९३॥
अवैधव्यकारकव्रत ऎसें । सकल वनितांनीं करावें आपैसे ।
धर्म पुसें याचें विधान कैसें । मज सांगावें केशवा ॥९४॥
कृष्ण म्हणे धर्मराजा । तुझी मति अति ओजा ।
म्हणुनि त्वां प्रश्न काजा । करूनि मज संमानिलें ॥९५॥
या व्रताचा विधि ऎसा । श्रवण करी तूं आपैसा ।
ठेवूनि पूर्ण भरवसा । आराधावें शिवगौरीसी ॥९६॥


वर्जूनि गुरुशुक्र अस्तासि । तैसीच अमावस्येसि ।
श्रावणमासीं भौमवारेसी । शुभारंभ तो करावा ॥९७॥
करूनि सुवासिनींसी आवंतण । या व्रतपूजकारण ।
प्रात:कालीं करूनि अभ्यंगस्नान । असावें आपण निराहारी ॥९८॥
नानाविध पत्री जमवून । षोडशोपचारीं पूजेकारण ।
साळीडाळीची मुष्टि अर्पण । करावी शिवगौरीसी ॥९९॥
ब्राह्मणमुखें कथाश्रवण । करूनि सरस्वती ब्राह्मणपूजन ।
ब्राह्मणासी द्यावें दक्षिणादान । यथोचित आदरें करूनिया ॥१००॥


देवीचें मध्यान्ह पंचोपचारपूजन । करावें महानैवेद्यसमर्पण ।
नानाविध पक्वान्नें आपण । करावीं महानैवेद्यासी ॥१०१॥
पात्रीं कणिकेचे सोळा दिवे ठेवून । करावें मंगलार्तिक्य जाण ।
नमस्कार प्रदक्षिणा करून । वायनसंभार करावा ॥१०२॥
पहिलें वायन विप्राकारण । नंतर द्यावें मातेसी वायन ।
मात नसेल तरी मातेसमान । सुवासिनींसी आदरावें यथोपचारें ॥१०३॥
तये दिनी लवणवर्जित अन्न । करावें मनोभावें सेवन ।
यथाशक्ति अन्नदान । करावें आपण त्या दिनीं ॥१०४॥


होतां रजनीकाल प्राप्त । सायाह्नीं करावें महार्तिक्य ।
रात्रीं करावा जागर यथोचित । मंगलागौरीसी जागवावें ॥१०५॥
दुजे दिनीं उत्तरपूजा करुन । देवीसी करावें विसर्जन ।
पूजासाहित्य ब्राह्मणासी देऊन । प्रतिमा जतन करावी ॥१०६॥
ऎसें व्रत आचारावें । पंच वा अष्ट संवत्सर बरवें ।
अंतीं उद्यापन करावें । मातेसी द्यावें वायनदान ॥१०७॥
ऎसी मंगलागौरीव्रतकथा । उन्मेषानंद वदे तत्त्वतां ।
पठतां सकलमनोरथपूर्णता । अंती शिवलोक प्राप्त होई ॥१०८॥

इति मंगलागौरी-व्रतकथा संपूर्णा ॥ हरये नमो, हरये नमो, हरये नम: ॥

श्रीशिवमंगलागौर्यार्पणमस्तु ॥ 

<poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:स्तोत्रे]]